परभणी : कामगार कल्याण राज्य नाट्य स्पर्धेत ललित कला भवन परभणीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या प्रा.रविशंकर झिंगरे लिखित, सौ. स्नेहल पुराणिक निर्मित व विजय करभाजन दिग्दर्शित गंमत असते नात्याची या नाटकास सांघिक द्वितीय पारितोषिकासह ६ पारितोषिक मिळाले असून अंतिम स्पर्धेसाठी या नाटकाची निवड झाली आहे.
हे नाटक छत्रपती संभाजीनगर येथे सादर करण्यात आले होते. या नाटकातील कलावंत डॉ. अर्चना चिक्षे यांना अभिनयाचे प्रथम पारितोषिक, किशोर पुराणिक यांना अभिनयाचे द्वितीय, मोनिका गंधर्व यांना अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले तर नाट्य दिग्दर्शन विजय करभाजन यांना प्रथम, संगीत त्र्यंबक वडसकर यांना तृतीय व सांघिक द्वितीय पारितोषिक मिळाले. या नाटकात वैभव उदास, मोनिका गंधर्व, किशोर पुराणिक, डॉ. अर्चना चिक्षे यांच्या भूमिका होत्या. या नाटकाचे नेपथ्य प्रा. किशोर विश्वामित्रे, प्रकाश योजना नारायण त्यारे, संगीत त्र्यंबक वडसकर, रंगभूषा वेशभूषा आयुशी चिक्षे यांची होती. संघप्रमुख संजय पांडे तर या नाटकासाठी अनिकेत शेंडे, कार्तिक विश्वामित्रे, आर्यन पाटोळे, श्रीकांत काळे, खालेद मामु आदींनी परिश्रम घेतले.
सोलापूर येथे होणा-या अंतिम स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवण्याचा मानस कलावंतांनी व्यक्त केला आहे. तर ललित कला भवन परभणीचे समन्वयक विश्वनाथ साखरे व बालगंधर्व सांस्कृतिक कला क्रीडा व युवक मंडळ परभणीचे अध्यक्ष संजय पांडे यांनी कलावंतांचा सत्कार केला व अंतिम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.