मानवत : जीवन हे एखाद्या खेळासारखेच असते. त्यात कधी यश मिळते तर कधी अपयश. मात्र हे महत्वाचे नसून जी जबाबदारी मिळाली आहे ती पूर्ण क्षमतेने पार पाडल्यास आयुष्य सुंदर होते, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या प्रभारी कुलगुरू डॉ.माधुरी देशपांडे यांनी केले.
मानवत येथिल के.के.एम.महाविद्यालय येथे शुक्रवार, दि. १९ रोजी अखिल भारतीय पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि के.के.एम.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सदरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढे बोलताना देशपांडे यांनी सांगितले की, व्यक्तिमत्व विकासात खेळाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कारण व्यक्तिमत्व विकासासासाठी आवश्यक असणा-या विविध कौशल्यांचा विकास खेळाच्या माध्यमातून होतो. टीमचा सदस्य, कॅप्टन म्हणून जबाबदारी पार पडताना खेळाडूला वक्तशीरपणा, शिस्त, प्रयत्नातील सातत्य हे गुण आत्मसात करावे लागतात. तसेच खिलाडूवृत्ती विकसित झाल्यामुळे भावनिक विकासही होतो.
यावेळी पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव बालकिशनजी चांडक यांनी युवाशक्तीमधील चैतन्य वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन होणे आवश्यक आहे. युवक पुढे गेला तर देशाचा विकास होतो. ही स्पर्धा जिंकून खेळाडूनी देशपातळीवर सुद्धा यश मिळवले पाहिजे असे सांगितले. यावेळी सहभागी संघांनी पथसंचलन केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, सहसचिव अनिलराव नखाते, अखिल भारतीय खो-खो महासंघ सहसचिव डॉ.चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन सचिव अॅड. गोविंद शर्मा, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ स्पर्धा निरीक्षक डॉ. प्रदीप देशमुख, पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य आनंदराम मंत्री, जयकुमार काला, डॉ.आनंद कत्रुवार, विजयकुमार दलाल, दिलीप हिबारे, संजय बांगड, अॅड.दिगंबरराव बारटक्के, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी तर सूत्रसंचालन डॉ.दुर्गेश रवंदे यांनी केले.
आभार प्रा.विनोद हिबारे यांनी मानले. स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान या पाच राज्यातील एकूण ५६ विद्यापीठाच्या संघांनी सहभाग नोंदवला. प्रारंभीच्या सामन्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या संघाने विजयी सलामी देत अत्यंत चुरशीच्या झालेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला.