बारामती : प्रतिनिधी
बारामती लोकसभा मतदारसंघात बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती, अशी जाहीर कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
यंदाच्या निवडणुकीत बारामतीत पवार कुटुंबात मोठा राजकीय संघर्ष रंगला होता. अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना राजकीय आव्हान देत सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवलं होतं. मात्र सुनेत्रा पवार यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता निवडणूक निकालाच्या दोन महिन्यांनी अजित पवारांनी उमेदवारीबाबत आपल्याकडून चूक झाल्याचे सांगितले आहे.
बारामतीत कोणी लाडकी बहीण आहे का तुमची, असा प्रश्न वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी आहे, मात्र सर्वच बहिणी माझ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालते. पण राजकारण हे घरामध्ये शिरू द्यायचे नसते. लोकसभेला मात्र माझ्याकडून चूक झाली. मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. तेव्हा पार्लमेंट्री बोर्डाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला गेला. आता एकदा बाण सुटल्यावर माघारी घेता येत नाही.
परंतु आज माझे मन मला सांगते तसे व्हायला नको होते, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
राखीपौर्णिमेला तुम्ही सुप्रिया सुळेंकडे जाणार आहात का? असाही प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर माझा सध्या राज्यभरात दौरा सुरू आहे. मात्र राखीपौर्णिमेच्या काळात मी जर बारामतीत असेल आणि माझ्या बहिणीही तिथं असतील तर मी नक्कीच जाईल, असे अजित पवारांनी म्हटले आहे.