धुळे : प्रतिनिधी
भाजपने कधीकाळी नवाब मलिक यांच्यावर टोकाचे आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवारांना पत्र लिहिले होते, की आमच्या आघाडीमध्ये नवाब मलिक चालणार नाहीत. जेव्हा फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा सुप्रिया सुळे एकटी त्यांच्या बाजूने बोलली होती, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आज धुळे जिल्ह्याच्या दौ-यावर आलेल्या असताना त्यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिक यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला.
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, नवाब मलिक आणि आम्ही १८ वर्षे सोबत काम केले आहे. सोयीप्रमाणे नाते जोडायचे आणि सोयीप्रमाणे नाते तोडायचे, हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील, पण आमचे नाही. एकदा नाते जोडले की ते आयुष्यभर टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची आहे.
भाजपने सर्वत्र गलिच्छ राजकारण केले
भाजप हा पक्ष पूर्वी सुसंस्कृत होता. आता नवीन भाजपने महाराष्ट्र आणि देशात गलिच्छ राजकारण केले आहे. महाराष्ट्र संविधानाने चालतो, कोणाच्याही मनमानीने चालत नाही. सत्ता, पैसा, पद या गोष्टी येतात आणि जातात. शेतक-यांच्या पिकांना हमीभाव द्यावा, आशा स्वयंसेवक महिलांना पाच हजार देतो म्हणाले होते, अद्याप त्यांना पैसे दिले नाहीत. येत्या पाच दिवसांत जर आशा वर्कर महिलांना पाच हजार रुपये मिळाले नाहीत, तर मी आंदोलन करणार असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.