मुंबई : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर्शन घेतल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे. देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या घरी जाऊन गणपतीची आरती केल्यानंतर आता अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधानांनी गणेशाची आरती केल्याची ही पहिलीच घटना आहे. या विषयावर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलावले असेल तर ही चूकच असे प्रतिक्रिया कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिली आहे.
उल्हास बापट म्हणाले, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश दोन्ही घटनेचे पद आहेत. घटनेच्या अनेक तत्वांना आता तिलांजली दिली जात आहे. घटनेत सगळ्याच गोष्टी लिहलेल्या नसतात, घटना उत्क्रांत होत गेलेली असते. प्रसिद्धीपासून न्यायाधीशांनी दूर राहावे असे म्हटले आहे पण याकडे दुर्लक्ष झाले आहे. सरन्यायाधीशांनी पंतप्रधान यांना बोलावले असेल तर ही चूक आहेच. दुस-या बाजूला मात्र जर पंतप्रधान आपणहून त्यांच्याकडे गेले असतील सरन्यायाधीश यांनी अशी भेट चुकीची आहे हे सांगायला पाहिजे. लोकशाही सुदृढ करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि सरन्यायाधीशांवर असते आणि असे काही होत असेल तर ही चूक झाली आहे असेही बापट म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. तेथेही पंतप्रधानांनी गणपतीपुजेत सहभाग घेतला होता. बुधवारी पंतप्रधानांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सरन्यायाधीशांनी कुटुंबासह त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पीएम मोदींनी बाप्पाची आरती केली. यावेळी अतिशय भक्तीमय वातावरण दिसून आले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दर्शन घेतल्यानंतर वादाचा घंटानाद सुरू झाला आहे.
पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणे हे प्रोटोकॉलला धरून आहे का, असा सवाल विरोधकांनी केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्यासाठी कोर्टाची मदत घेतली जातेय का, या लोकांच्या मनातल्या शंका यामुळे पक्क्या झाल्याचा घणाघात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. तर या गोष्टीवरून राजकारण करणे हे नासक्या विचारांचे लक्षण असल्याचे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे. तर संजय राऊतांनी हा गणपतीचा अपमान केला आहे असे प्रत्युत्तर सोमय्यांनी दिले आहे.