19.1 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeराष्ट्रीयभारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून स्मरणात राहील

भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून स्मरणात राहील

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिकांकडून पैसे घेतल्याबद्दल संसदीय नैतिकता समितीने त्यांना दोषी ठरविल्यानंतर लोकसभेने त्यांची खासदारकी रद्द केली. समितीने मोइत्रा यांचे वर्तन अशोभनीय आणि अनैतिक असल्याचा ठपका ठेवला आहे. महुआ मोइत्रा यांची रद्द केलेली खासदारकी तसेच त्यांना सभागृहात बोलू न दिल्याबाबत विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत तीव्र निषेध व्यक्त केला.

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर समितीच्या अहवालावर चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. मोइत्रा यांना बोलू देण्यात आले नाही. गदारोळातच संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला. तो आवाजी मतदानाने स्वीकारण्यात आला. यानंतर अमोल कोल्हे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत भाष्य केले.

हा दिवस भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस म्हणून स्मरणात राहील. खासदार आणि माझ्या सहकारी महुआ मोइत्रा, ज्यांनी केंद्र सरकारला कठीण प्रश्न विचारले होते, त्यांची लोकसभेतून नैतिकता समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे हकालपट्टी करण्यात आली. गंमत अशी की, समितीने मांडलेल्या अहवालावर साधी चर्चासुद्धा घेण्याचा विचार या सरकारने केला नाही. संसदेच्या सभागृहातील खासदारांचा आवाज बंद करण्याची वृत्ती सरकारची आहे, हेच यातून दिसते. हे भयंकर आहे. लोकशाही तत्त्वे चिरडली गेली आहेत. या भ्याड कृत्याचा निर्विवादपणे निषेध करतो, असे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR