22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रसगेसोयरे संदर्भात हरकतींच्या अभ्यासासाठी ४ महिने लागतील : शिंदे

सगेसोयरे संदर्भात हरकतींच्या अभ्यासासाठी ४ महिने लागतील : शिंदे

मुंबई : मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून आचारसंहिता लागण्यापूर्वी सगेसोयरे अध्यादेशचा काढतील, अशी आशा आहे. सरकारने तसे न केल्यास आचारसंहितेनंतर सरकारच्या डावाला प्रतिडावाने उत्तर देऊ, असे मत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केले. मात्र, आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सरकारने सगेसोयरे किंवा जरांगे यांच्या मागणीनुसार कुठलाही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सरकारने केलेल्या कामांची आणि निर्णयांची माहिती दिली.

यावेळी, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केले. आमच्या सरकारने लोकांमध्ये जाऊन काम केलें आहे, घरी बसून आणि फेसबुक लाईव्ह करुन सरकार चालत नसते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मराठा आरक्षणासंदर्भाने मनोज जरांगेंच्या मागणीसंदर्भात प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. जरांगेंच्या मागण्यांवर सरकार विचार करत असून सरकारने सगेसोयरेचं नोटीफिकेशन काढले होते.

सरकारच्या या नोटीफिकेशनवर ८ लाख ४७ हजार हरकती आल्या आहेत. या हरकतींचा अभ्यास केला जात असून या प्रक्रियेला ४ महिने लागतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. त्यामुळे, मनोज जरांगे यांनीही वस्तूस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी वडवणी येथील भाषणातून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल करत, भाजपाचा ४८ पैकी एकही जागा निवडून येणार नाही, असा इशाराच दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR