इंदापूर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे आज मोठे शक्ती प्रदर्शन करत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का दिला. इंदापूरच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व मातब्बर नेते भरत शहा यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाची सत्ता कोणाच्या हातामध्ये द्यायची, याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. ज्या कुटुंबाने अनेक वर्षे देशाच्या स्वातंत्र्याआधी व देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाची सेवा केली, अशा कुटुंबाच्या हातात देशाची सत्ता द्यायची की, माणूस, जात, धर्म, भाषांमध्ये दुरावा वाढविण्यासाठी सत्तेचा गैरवापर ज्यांनी केला त्यांच्या हातात सत्ता द्यायची, याचा विचार करण्याची आज वेळ आली आहे.
मी अनेक राज्यात महाराष्ट्राच्या कानाकोप-यात जात असतो. मी बघतोय की यावेळी लोकांची मनस्थिती वेगळी दिसत आहे. काल सातारामध्ये शशिकांत शिंदे यांचा फॉर्म भरण्यासाठी गेलो असता पंधरा ते वीस हजार लोक भर उन्हात शशिकांत शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्याने चालत होते. अशीच परिस्थिती महाराष्ट्रात सगळीकडे आहे. आता लोकांच्या लक्षात आले आहे की, या देशाची सत्ता पुन्हा मोदींच्या हातात द्यायची नाही.