हैदराबाद : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यातील पहिल्या दिवस भारताच्या नावे राहिला. नाणेफेक जिंकलेल्या इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंडला सर्वबाद २४६ पर्यंत मजल मारता आली. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने दिवस संपेपर्यत १ बाद ११९ धावांपर्यंत मजल मारली आहे. इंग्लंडकडे अजूनही १२७ धावांची आघाडी आहे. मात्र, भारताने आक्रमक गोलंदाजी आणि फलंदाजी करत आजचा दिवस आपल्या नावावर केला आहे. भारताकडून रोहित शर्मा २७ चेंडूमध्ये २४ धावा करत बाद झाला. तर यशस्वी जैस्वाल ७० चेंडूमध्ये ७६ आणि शुभमन गिल ४३चेंडूमध्ये १४ धावा करत क्रिजवर टिकून आहे.
भारताने पहिल्या कसोटीत पाहुण्या इंग्लंडचा पहिला डाव पहिल्याच दिवशी २४६ धावांवर गुंडाळला. या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरश: घेरुन ठेवलं. भारताकडून रवींद्र जाडेजा आणि आर अश्विनने प्रत्येकी ३ तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावा केल्या.
यानंतर भारताकडून सलामीसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल मैदानात उतरले. या दोघांनी आपल्या स्टाईलमध्ये धुलाईला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या १० ओव्हरमध्ये ६५ धावांचा टप्पा पार केला. एकीकडे यशस्वी जयस्वालने अर्धशतक पूर्ण केलं, तर दुसरीकडे रोहित शर्मा त्याला साथ देत सावध खेळत होता. मात्र एक फटका खेळण्याच्या नादात लीचच्या गोलंदाजीवर रोहित २४ धावा करुन माघारी परतला. रोहित बाद झाला त्यावेळी भारताची धावसंख्या ८० होती.
भारतीय फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी .त्याआधी भारतीय गोलंदाजांनी धडाकेबाज गोलंदाजी केली. इंग्लंडकडून झॅक क्रॉली आणि बेन डकेत यांनी सावध सुरुवात केली. मात्र आर अश्विनने डकेतला पायचित करुन भारताला ५५ धावांवर पहिलं यश मिळवून दिलं. डकेतने ३९ चेंडूत ३५ धावा केल्या.त्यानंतर मग लगेचच रवींद्र जाडेजाने ओली पोपला १ धावेवर बाद केलं. मग अश्विननेच दुसरा सलामीवीर क्रॉलीचा काटा काढला. क्रॉलीला सिराजकरवी झेलबाद केलं. त्याने २० धावा केल्या. क्रॉली बाद झाला त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या ३बाद ६० अशी होती. यानंतर मग ज्यो रुट आणि जॉनी बेअस्ट्रो यांनी डाव सांभाळला. दोघांनी संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. एकीकडे ही जोडी जमत आहे असं वाटत असतानाच, अक्षर पटेलने बेअस्ट्रोचा अडथळा दूर केला.