22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रविधानसभा निवडणुकीत जनता उद्धव ठाकरेंना धडा शिकवेल

विधानसभा निवडणुकीत जनता उद्धव ठाकरेंना धडा शिकवेल

मुंबई (प्रतिनिधी) : आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मागणार असल्याची वल्गना उद्धव ठाकरे करत आहेत मात्र हिंदुत्वाला दिलेली तिलांजली, सरकारी योजनांमध्ये खोडा घालण्याचे प्रयत्न व २०१९ मध्ये जनादेशाचा केलेला अनादर यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांना जनता नाकारल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरूवारी येथे व्यक्त केला. बांगला देशमध्ये हिंदूंच्या हत्या होत असताना त्याचा निषेध करण्याएवढे ठाकरे सेनेचे हिंदुत्व जागृत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे हे दिल्ली दौ-यावर आहेत. ठाकरे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार टीका केली. या टीकेला दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे राज्याच्या भल्यासाठी, जनतेच्या हितासाठी दिल्लीला जातात तेव्हा महाराष्ट्र दिल्लीच्या इशा-यावर चालू देणार नाही, या शब्दांत उद्धव ठाकरे टीका करतात. मग हेच ठाकरे महाशय आता दिल्ली दौ-यावर का गेले? मुख्यमंत्रिपदाची याचना करण्यासाठी कोणाच्या दारात गेले? असे सवाल दानवे यांनी केले.

दिल्ली दौ-यात ठाकरे यांनी आपणच किती कार्यक्षम मुख्यमंत्री होतो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत विविध नेत्यांच्या भेटींदरम्यान मुख्यमंत्रिपदाची याचना करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. महाविकास आघाडीतील एका सहका-याने त्यांच्या पुस्तकात तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या संपूर्ण मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात केवळ एक दिवस मंत्रालयात गेले याची खंत वाटते, असे मत व्यक्त केले होते. या वरूनच एक मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंची कार्यक्षमता काय होती हे दिसून येते, अशी टीका दानवे यांनी केली.

बांगलादेशसारखी स्थिती भारतातदेखील उद्भवू शकते अशी चिथावणीखोर भाषा हिंदुत्वापासून कोसो दूर गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी त्वरित थांबवावी, असा इशाराही दानवे यांनी दिला. शिवसेना-भाजपा युतीच्या काळात निवडणुकीतील जागावाटप, रणनिती या सगळ्यांच्या चर्चा, बैठका प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर होत असत मात्र आता जागावाटपासाठी दिल्लीला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या दारात जाण्याची पाळी तुमच्यावर आली आहे, अशी टीकाही रावसाहेब दानवे यांनी या वेळी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR