छत्रपती संभाजी नगर : मनोज जरांगे यांनी धोरणात्मक लढा जिंकलेला आहे, सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे, जे मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं, ते सरकारने केलेलं आहे. अशी भूमिका आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून मराठा मोर्चा मुंबईकडे निघाला आहे. लाखो मराठा बांधव या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत. हा मोर्चा २६ तारखेला मुंबईत पोहोचेल. २६ तारखेपासून मुंबईत उपोषण सुरु होणार आहे. जरांगे पाटलांनी मोर्चा काढू नये, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सरकारने प्रयत्न केले. परंतु ते निष्फळ ठरले.
आमदार बच्चू कडू यांनी पूर्वीच मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ते मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रया दिली. ते म्हणाले की, सगेसोय-यांबाबत सगळ्या दुरुस्त्या केल्या आहेत. जरांगे पाटलांनीही ते स्वीकारले आहे. त्यामुळे धोरणात्मक लढाई त्यांनी जिंकली आहे.
बच्चू कडू पुढे म्हणाले, जरांगे पाटलांचा मूळ प्रश्न असा आहे की, ५४ लाख नोंदींना जातीचे दाखले दिले पाहिजेत. २० तारखेपर्यंत ५४ लाख नोंदी द्या, अशी त्यांनी मागणी केली. याबाबत प्रशासकीय पातळीवर तशा सूचना दिलेल्या आहेत. सरकार सकारात्मक असून जरांगे पाटलांनीही हे बोलून दाखवले आहे.
बच्चू कडू म्हणाले…
– जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश यावे, अशीच माझी भूमिका आहे. कोर्टाच्या तारखा सांभाळून मी मोर्चा कव्हर करणार आहे.
– आता मी आंदोलक म्हणून मोर्चामध्ये जात आहे आणि सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे.
– नोंदींची वंशावळ काढणे, ही कठीण गोष्ट असून ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी अधिकचा वेळ लागणार आहे. सरकारने जातीचे दाखले देण्यासाठी मोहीम सुरु केली आहे.