मुंबई : प्रतिनिधी
नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख आधुनिक मोहम्मद अली जिना असा केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे पाटील आणि नारायण राणे यांच्यात देखील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
दरम्यान, सिंधुदुर्गमध्ये एका सभेला संबोधित करताना नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. राणे म्हणाले होते की, जरांगे म्हणाले ‘राणे मराठवाड्यात येत असतील तर येऊ दे, आमच्याकडे काय पाहणार? आम्ही कपडे घालतो.’ तू कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढलेस तरी तसाच दिसतो. तुझ्यात आहे काय बघण्यासारखं? इतक्या वर्षांत ब-याच जणांनी दाढी वाढवली पण ते छत्रपती झाले का, नाही होत छत्रपती. जातपात, धर्म बाजूला ठेवा आणि विकासाच्या मुद्यावर एकत्र या, असे आवाहन नारायण राणे यांनी केले होते.
यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे एक तरी मराठा समाजातील तरुणाचा फायदा झाला असेल तर त्याचा हिशेब आम्हाला द्या. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजापेक्षा मुस्लिम समाजाचा फायदा अधिक झाला आहे. मनोज जरांगे म्हणजे आधुनिक मोहम्मद अली जिना तर नाही ना, असा प्रश्न घराघरांमधून विचारला जातोय.
पुढे ते म्हणाले, जरांगे गोधडीत असताना नारायण राणे यांनी आरक्षण मिळवून दाखवले आहे. आम्हाला आव्हान देऊ नका. तुमच्या शाळेचे नारायण राणे हे प्राध्यापक आहेत. मनोज जरांगेच्या दाढीवर आता संशय यायला लागला आहे. नक्की तू मराठा आहेस, की आधुनिक महम्मद अली जिना?असा सवाल देखील नितेश राणे यांनी केला आहे.