25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeराष्ट्रीय३०० रुपयांचे दागिणे परदेशी महिलेला विकले ६ कोटींमध्ये

३०० रुपयांचे दागिणे परदेशी महिलेला विकले ६ कोटींमध्ये

जयपूर येथील घटना अमेरिकन महिलेची पोलिसांत तक्रार

जयपूर : राजस्थानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बनावट दागिने विकून परदेशी महिलेची कोट्यवधींची फसवणूक केल्याची घटना जयपूरमध्ये उघडकीस आली आहे. जयपूर हे रत्न आणि दागिन्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे परदेशी नागरिक खरेदी करण्यासाठी जयपूरमध्ये येत असतात. मात्र असे दागिने घेण्यासाठी अमेरिकेतून आलेल्या एका परेदशी महिलेची ६ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

या महिलेकडून जयपूरच्या एका ज्वेलर्सने ६ कोटी रुपये घेत बनावट प्रमाणपत्र बनवले आणि बनावट सोन्याचे दागिने विकले. ज्वेलर्स पिता-पुत्राने बनावट दागिन्यांना सोन्याचे पॉलिश करुन परदेशी महिलेला विकले होते. ज्वेलर्स पिता-पुत्राने चांदीच्या साखळीवर सोन्याचे पॉलिश आणि ३०० रुपये किमतीचा मोझोनाईट स्टोन लाखो रुपये किमतीचा हिरा असल्याचे सांगून बनावट प्रमाणपत्रासह महिलेला दिला होता. फसवणुकीचा बळी ठरलेल्या अमेरिकेतील महिलेने मानक चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ज्वेलर्स पिता-पुत्र फरार झाले होते. मात्र पोलिसांनी बनावट प्रमाणपत्र बनविणा-या नंदकिशोर नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

फसवणूक झालेल्या महिलेचे नाव चेरीश असून तिने सांगितले की ती जयपूरमधून दागिने खरेदी करून अमेरिकेत विकण्याचा व्यवसाय करते. २०२२ मध्ये तिची भेट आरोपी गौरव सोनीशी झाली होती. मानक चौक परिसरात त्याचे दागिन्यांचे शोरूम आहे. दोन वर्षांत चेरीशने गौरव सोनीकडून सुमारे ६ कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी केले होते. या दागिन्यांची मूळ किंमत ही ३०० ते ६०० रुपये असायची. मात्र ते दागिने कोट्यवधी रुपयांना चेरीशला विकली गेली. एप्रिलमध्ये अमेरिकेत झालेल्या एका ज्वेलरी शोमध्ये चेरीशला तिने विकत घेतलेले दागिने बनावट असल्याचे आढळून आले. या सगळ्या प्रकारानंतर चेरीशने जयपूरला येऊन ज्वेलर्स गौरव सोनी आणि त्याचे वडील राजेंद्र यांना बनावट दागिने विकण्याबाबत जाब विचारला.

त्यावर सोनी पिता पुत्राने चेरीशला गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तिला हकलवून दिले. त्यानंतर चेरीशने अमेरिकन दूतावासात तक्रार करून न्याय मागितला. त्यानंतर गौरव आणि त्याच्या वडिलांविरुद्ध मानक चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास अतिरिक्त डीसीपी बजरंगसिंह शेखावत यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पोलिसांनी बनावट प्रमाणपत्र देणा-या आरोपीला अटक केली आहे. हॉलमार्क प्रमाणपत्रे तयार करणा-या ज्वेलर्सकडे कोणत्याही दर्जाची उपकरणे नसून बनावट प्रमाणपत्रे जारी केल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR