नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरच्या रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळीने याची जबाबदारी घेतली. आता याबाबत नवी माहिती समोर येत असून मुंबई पोलिस स्टँड कॉमेडियन मुनावर फारुकीलाही सुरक्षा पुरवणार आहेत. नुकताच मुनव्वर दिल्लीत असताना काही लोकांनी त्याचा पाठलाग केला. ‘‘जो सलमान के पास वो भगवान के पास’’ असा कयास बांधल्या जात असल्याने आता त्यालाही बिश्नोई टोळीपासून धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्येनंतर पोलिसांना कोणताही धोका पत्करायचा नाही, त्यामुळे त्यालाही पोलीस सुरक्षा पुरवणार आहेत. दिल्लीत मुनव्वरचा पाठलाग करणा-या लोकांचे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीत मुनावरचा पाठलाग का केला जात होता? मुनावर जर लॉरेन्सचे टार्गेट असेल तर का? या मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याआधी पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ केली आहे.
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर १३ ऑक्टोबरला फेसबुकवर एक पोस्ट टाकत लॉरेन्स बिश्नोई टोळीने याची जबाबदारी घेतली होती आणि म्हटले होते की, ‘‘सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको आहे. आमचे कोणाशीही वैर नाही, पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद इब्राहिमला मदत करतो, त्याने आपले खाते व्यवस्थित ठेवावे, असेही पोस्टमध्ये लिहिले होते. सलमानला आधीच मुंबई पोलिसांची सुरक्षा असली तरी ही पोस्ट समोर आल्यानंतर पोलिस आणखी सतर्क झाले आणि त्याची सुरक्षा वाढवण्यात आली.
आधी त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आणि त्यानंतर पनवेल येथील सलमानच्या फार्महाऊसवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. मात्र, मुंबईतील वांद्रे पूर्व येथे बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला होता. ते त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर होते. त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.