मुंबई : विधान परिषद सभापती पदावरुन महायुतीत जुंपल्याचे चित्र आहे. गेल्या काही वर्षांपासून विधान परिषदेतील सभापती पद रिक्त आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नवा सभापती निवडला जाऊ शकतो. पण, या पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेंच सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सभापती पदावर दावा केला आहे. त्यामुळे पेच निर्माण होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सभापती पदासाठी इच्छुक आहे. सत्तेत सहभागी होताना विधान परिषद सभापती पद देण्याचे भाजपने आश्वासन दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दूसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा देखील सभापती पदावर दावा आहे. त्यामुळे सभापती पदावरून महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही काळापासून विधान परिषदेचे सभापती पद रिक्त आहे. सध्या उपसभापती निलम गो-हे विधान परिषदेचे कामकाज पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीआधीचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे त्यापूर्वी विधान परिषदेच्या सभापतीची निवड केली जाण्याची शक्यता आहे. सध्या या पदासाठी भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून निलम गो-हे इच्छुक आहेत. त्यामुळे या पदासाठी कोणाला संधी मिळते हे पाहावे लागणार आहे. दरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये काल आरक्षणाच्या चर्चेवरून गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचे कामकाज संपविण्यात आले होते. मात्र आजपण आरक्षणाच्या विषयांवरून गदारोळ होणार का? हे पाहणे महत्वाचे राहणार आहे. सोबतच काल या गोंधळात ९४ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मान्य करण्यात आल्या, यावरून देखील आज विरोधक सत्ताधा-यांना घेरू शकतात.