मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढल्याने आता सरकारमध्येच वाद रंगला आहे. एकीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी आता ओबीसींच्या हक्काचा घास पळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे, तर सरकारच्या अध्यादेशामुळे ओबीसीमध्ये अस्वस्थता पसरल्याचे म्हटले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाव न घेता प्रत्युत्तर दिले असून, मराठा समाजाने अनेकांना मोठे केले. मग त्यांना देण्याची वेळ येते, त्यावेळी समाजात तेढ निर्माण करणे चुकीचे आहे, अशा शब्दांत टीकास्त्र सोडले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही झाले तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असे म्हटले. परंतु यावरून आता सरकारमध्येच वाद होण्याची चिन्हे आहेत.
प्रतापगडावरील गडकोट मोहिमेच्या समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हजेरी लावली, त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठरविले आहे. ओबीसींवर कुठलाही अन्याय न होऊ देता कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षण दिले जाणार आहे. मुळात मराठा समाजाला न्याय मिळावा, ही सरकारची भूमिका असताना काही लोक वेगळी विधाने करून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत. मराठा समाजाने अनेकांना मोठे केले. परंतु मराठा समाजाला देण्याची वेळ आली, तेव्हा चुकीची विधाने करून समाजात तेढ निर्माण करू नये.
दरम्यानमराठा समाजाच्या मोर्चानंतर ओबीसी संघटनांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. ज्यांची कुणबी नोंद आहे, त्यांना प्रमाणपत्र देण्यास विरोध नव्हता. आता मात्र ओबीसी लेकरांच्या तोंडाचा घास पळविण्यात आला असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. सगेसोयरे मसुद्याच्या विरोधात लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवण्याचे आवाहनही यावेळी भुजबळांनी केले.
भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
मला सुरुवातीच्या एकाच निर्णयात विश्वासात घेतले. त्यानंतर मला कोणत्याही निर्णयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासात घेतले नाही. मी केवळ मागचा काही दिवसांपासून जे निर्णय घेतले जात आहे ते पाहत असल्याचे त्यांनी म्हटले. ओबीसी समुदायात बॅकडोअर एन्ट्री करण्याचे काम सध्या सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.