नवी दिल्ली :आयपीएल २०२४ १७ व्या सत्रामुळे सध्या देशभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलाच उत्साह आहे. चाहते आयपीएलच्या सर्वच सामन्याला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत आहेत. आयपीएल स्पर्धेनंतर २ जूनपासून टी-२० विश्वचषक २०२४ ला सुरूवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या या स्पर्धेत भारतीय संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.दरम्यान, वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लाराने टीम इंडियाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतासाठी डावाची सुरुवात करू नये, असे लारालाचे मत आहे.
दरम्यान, आगामी टी-२० विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करू शकतात, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पण, आता माजी कॅरेबियन दिग्गज ब्रायन लारा याने विराट कोहली आणि रोहित शर्माऐवजी सीनियर आणि ज्युनियरच्या जोडीला मैदानात उतरवणे चांगले आहे, असे विधान केले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही टीम इंडियाचे सर्वात मोठे फलंदाज आहेत. अशा स्थितीत त्याने संघाला दमदार सुरुवात करून दिली तर भारत निश्चितच मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकतो, मात्र, लाराला वाटते की, भारताने डावाची सुरूवात एका नव्या खेळाडूला घेऊन करावी आणि अनुभवी खेळाडूनी दूस-या आणि तिस-या क्रमांकावर खेळावे, असे लारा म्हणाला.