जळगाव : भाजपच्या वाटेवर जाणार असल्याचे सांगणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुढील काळात राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. यांनतर मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या तीस वर्षापासून एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये राजकीय वैमनस्य असल्याचे मुक्ताईनगरमध्ये पाहायला मिळाले आहे. त्यामुळं हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षासोबत राहणार असल्याचे वक्तव्य केले होते. यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे हे जनतेच्या विकासाचे राजकारण न करता कुटुंबाच्या स्वार्थाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. एकनाथ खडसे हे रंग बदलणारे सरपटणारे प्राणी आहेत. आपण आमदार झाल्याचे त्यांना सहन होत नसल्याने आणि वयामुळे ते भ्रमिष्ट झाले आहेत म्हणून ते काहीही बोलतात आणि वागतात. त्यांना आपण फारसे गंभीरतेने घेत नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील खोकेबाज आमदार : खडसे
एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील हे खोकेबाज आमदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका करताना एकेरी भाषेचा उल्लेख केला त्यांनी म्हटलंय की, चंद्रकांत पाटलांना नीतिमत्ता आहे का? तुझी नियत आहे का? राष्ट्रवादीच्या बळावर निवडून आला त्यांना टांग मारून परत म्हणतो मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे. आता म्हणतोय मी शिंदे साहेबांचा आहे. नेमका तू कोणाचा आहे? सरड्यासारखा रंग कोण बदलत आहे? तू बदलतोय का मी बदलतोय? मी तर अजून कुठल्याच पक्षात गेलेलो नाही, अशी पलटवार एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केला.
आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा
बोडवड उपसा जलसिंचन योजनेबाबतदेखील दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करताना पाहायला मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे परिवारात आमना-सामना होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या दोन्ही नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप कलगीतुरा आतापासूनच रंगल्याचे दिसून येत आहे.