परभणी : निसर्गाच्या साधन संपत्तीने नटलेल्या सह्याद्री पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर (समुद्र सपाटीपासून १६४६ मी. उंच) परभणी येथील पर्यावरणप्रेमी शिक्षकांनी प्रदूषण मुक्त दिपावली साजरी करा असा संदेश देत यशस्वीपणे सर केले.
दिपावलीच्या पूर्वसंध्येला मंगळवार, दि. २९ परभणी येथील शिक्षक संभाजी मोरे, सुभाष ढगे, संदीप जाधव, अमित मोगल, मुंजाजी शेवाळे, राम पतंगे, गंगाराम राठोड, गजानन लोनसणे, शंकर शेळके, सुमित शिंदे यासह बालगिर्यारोहक अभंग कदम, बोधी कदम यांचा यात सहभाग होता. या शिक्षकांनी पहाटे ५ वाजता शिखर चढण्यास प्रारंभ करून सकाळी ८ वाजता शिखराच्या टोकावर पोहोचले.
महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट संबोधले जाणारे कळसुबाई शिखर सर करताना या चमूने रस्त्याने भेटणा-या गिर्यारोहकांना शिखरांवर कचरा करू नका, निसर्गाचे संवर्धन आपल्या हाती आहे. याविषयी विनंती करीत स्वत:चा कचरासोबत आणला. या विनंतीस अनेक गिर्यारोहकांनी प्रतिसाद देत अनुकरणही केले.