चंदिगड : हिमाचल प्रदेशातील मंडीतील भाजप खासदार आणि चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतचा आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोव-यात सापडला आहे. ‘इमर्जन्सी’विरोधात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मोहालीचे रहिवासी गुरिंदर सिंग आणि गुरमोहन सिंग यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची आणि सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तर भटिंडामध्ये या चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
सूत्रांच्या मते, या चित्रपटात शीख समुदायाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर केवळ बंदी घालू नये, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दिलेले प्रमाणपत्रही रद्द केले पाहिजे, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तज्ज्ञांचे एक पॅनेल तयार केले जावे, ज्यामध्ये एसजीपीसीचे प्रतिनिधी समाविष्ट केले जावेत, जे चित्रपट प्रथम पाहतील आणि त्यातील कोणतेही वादग्रस्त दृश्य प्रदर्शित होण्यापूर्वी काढून टाकले जावे, अशीही मागणी सदरच्या याचिकेत केली आहे. दरम्यान, ही याचिका अद्याप उच्च न्यायालयाने सूचिबध्द केली नाही.
भटिंडामध्ये शीख समुदायाकडून निदर्शने
दरम्यान, कट्टरपंथी खासदार अमृतपाल यांचे वकील इमान खारा यांनीही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. दरम्यान, पंजाबमधील भटिंडा शहरातील एका चित्रपटगृहाबाहेर आज शीख समुदायाच्या लोकांनी निदर्शने केली. या थिएटरमध्ये कंगना राणावतचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.