38.3 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeपरभणीशेती, राजकारण आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम म्हणजे कांतायण

शेती, राजकारण आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम म्हणजे कांतायण

परभणी : कांतराव काका यांचा कार्यपट पाहिल्यास असे लक्षात येते की शास्वत विकासासाठी समाज आणि येथील पुढा‍-यांनी काकांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. ते शासकीय काम करतानाही योजना शासकीय न समजता स्वत:च्या घरची आहे असे समजून काम करतात. त्यांनी केलेले कार्य हे सक्षम आहे. त्यामुळे ते शेती, राजकारण आणि समाजकारणाचा त्रिवेणी संगम आहेत असे मत कृषिरत्न विजय अण्णा बोराडे यांनी व्यक्त केले.

परभणी येथे रविवार, दि. १० रोजी कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या चरित्रग्रंथ प्रकाशन व कार्यगौरव सोहळ्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि.पुरुषोत्तम खेडेकर होते. यावेळी सत्कारमूर्ती कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर, गंगाबाई देशमुख, प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, मनपा आयुक्त संजय काटकर, माजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, कवि इंद्रजित भालेराव, इतिहासकार गंगाधर बनबरे, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख, कुलगुरू डॉ. इंद्र मणी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना बोराडे म्हणाले की, समाज विकासाचे कार्य करीत असताना प्रश्न किंवा वाद निर्माण न होता, भांडण तंटे अतिशय संयमाने सोडवून काम पूर्ण कसे करावे याचा आदर्शपाठ म्हणजे कांतराव काका आहेत असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. यावेळी कवी प्रा.इंद्रजित भालेराव म्हणाले की, काम करायचं पण काही बोलायचं नाही असं स्थितप्रज्ञ व्यक्तीमत्व म्हणजे काका होय. कांतायण हा गौरवग्रंथ उत्कट आणि वाचनीय झालेला असून ख-या अर्थाने ही एक सामाजिक कार्यगाथाच आहे. हा ग्रंथ पुरुषोत्तम खेडेकर यांच्या दृष्टिकोनातून निर्माण झाला असून याचे लेखन व संपादन उत्कृष्ट झाले असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

या सोहळ्यात मदन पाटील लिखित व गंगाधर बनबरे संपादित कांतायण-कांतराव काका देशमुखांची कार्यगाथा या पुस्तकाचे प्रकाशन व कृषिभूषण कांतराव काका देशमुख झरीकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सुभाष ढगे, प्रा.डॉ.जयंत बोबडे लिखित आणि आर्यन पाटोळे दिग्दर्शित समाजोन्नतीचे ध्यासपर्व या चित्रफितीचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने कांतराव देशमुख यांना शाल, हार, बैलगाडीची प्रतिकृती देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

अध्यक्षीय समारोपात इंजि. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, आधुनिक काळातील फुले आणि सावित्री म्हणजे काका आणि गंगाबाई आहेत. त्यांनी पूर्णांगिनी होऊन कांतराव यांना साथ दिली. यातूनच काकांच्या कार्याची चळवळ निर्माण झाली असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना कांतराव काका देशमुख म्हणाले, गोरगरीब मुलांना संधी मिळाली तर नक्कीच पुढे येतील. या उद्देशाने सुरू केलेले काम आपण सर्व सोबत राहून कार्य करू. परभणी येथे मुलींच्या वसतिगृहास मी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

यावेळी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, मनपा आयुक्त संजय काटकर, मनपा आयुक्त गणेश देशमुख, माजी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, कुलगुरू डॉ.इंद्र मणी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा.विठ्ठल भुसारे, सूत्रसंचालन डॉ.दिलीप शृंगारपुतळे तर आभार प्रा.सुभाष ढगे यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातूनच नव्हे तर जिल्हा बाहेरून विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR