मुंबई : बीड प्रकरणात नेमलेल्या एसआयटीत वाल्मिकी कराडचे काही मित्र आहेत. ते तपास यंत्रणेत हस्तक्षेप करू शकतात असा आरोप आम्ही केल्यानंतर एसआयटीमधून तिघांना बाहेर काढण्यात आले. वाल्मिकी कराड हा माझा जवळचा मित्र आहे असे बोललेल्या धनंजय मुंडेंचं काय करायचे? जर एखादा अधिकारी, शिपाई चौकशीत हस्तक्षेप करू शकतात म्हणून सरकारने त्यांना तपास समितीतून बाहेर काढले मग हे मंत्रिमहोदय काहीच करू शकत नाही असे सरकारला वाटत आहे का असा सवाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, ज्या वाहनातून वाल्मिकी कराड पुण्याच्या सीआयडी ऑफिसला गेला त्या गाडीचा मालक अजित पवारांच्या सभेत उपस्थित होता. सरकारला दुर्लक्ष करायचे असेल तर करा, पण राज्यातील जनतेला मूर्ख समजू नका. ९ तारखेला हत्या होऊन एक महिना झाला. आतापर्यंतच्या चौकशीत काय निष्पन्न झाले आहे? आतापर्यंत जितक्या चौकशी समिती नेमल्या त्यात तपासाआधी मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राजकारण बंद करावे. योग्य ती कारवाई करावी असं त्यांनी मागणी केली.
तसेच या घटनेने महाराष्ट्र बदनाम होतोय. दिल्लीच्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर या बातम्या आहेत हे महाराष्ट्रासाठी चांगले नाही. ज्यांनी खून करण्यास मदत केलीय त्यांचा राजीनामा मागतोय. वाल्मिकी कराडला सरकार वाचवणार, त्याच्याकडे कुठले घबाड आहे ज्याला सरकारही घाबरत आहे. विष्णू चाटेला मुख्य आरोपी करून हे प्रकरण मिटवून टाकायचे इथपर्यंत हे प्रकरण आणतील. कोण सुदर्शन घुले, बीडच्या गुन्हेगारीचा अभ्यास कराल तर त्यातील सर्व गुन्हेगार २२-२३ वयोगटातील आहेत. त्यांची घरे जाऊन तपासा. कुणीही कौलारू घरात राहत नाही. गेल्या १० वर्षापासून हेच सुरू आहे. त्याचा कर्ता करविता धनंजय मुंडेच आहेत असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला.
दरम्यान, ही माणुसकीची लढाई आहे मराठा-वंजारी नाही. संतोष देशमुख आठवतोय पण सोमनाथ सूर्यवंशी आठवत नाही. तो गंभीररित्या मारला गेला. न्यायालयीन कोठडीत त्याला मारले, ही हत्या आहे. सोमनाथला मारला कुणी, आरोपी कोण..हा माझा साधा प्रश्न आहे. सरकार यावर बोलायला तयार नाही. फुले शाहू आंबेडकरी विचारांचा खंदा कार्यकर्ता होता. आम्ही मुद्दा सोडणार नाही. सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख यांचं भूत सरकारच्या मानेवर बसवल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला.