19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रकन्नड सहकारी साखर कारखाना ‘ईडी’ने केला जप्त

कन्नड सहकारी साखर कारखाना ‘ईडी’ने केला जप्त

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीआधी ईडीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली. या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरु होती. ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली. त्यानंतर आता कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला. या जप्त केलेल्या कारखान्याची किमत ही ५० कोटी २० लाख इतकी आहे. या प्रकरणी १६१ एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राष्ट्रवादीचे अनेक नेते आरोपी बनवण्यात आले होते. रोहित पवार यांचीसुद्धा जवळपास ३ दिवस चौकशी झाली होती. सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर ईडीकडून कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करताना शिखर बँकेने जी प्रक्रिया राबवली होती ती चुकीची होती असे ईडीने म्हटले होते. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी केलेल्या कारवाईची माहिती घेत ईडीने प्राथमिक तपासाला सुरुवात केली. तसेच मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी २०१९ मध्ये दिलेल्या निकालाचा देखील अभ्यास करण्यात आला. या प्रकरणी मनी लाँन्ड्रींगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता ईडीकडून सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. ईडीने कन्नड सहकारी कारखान्याची जमीन, प्लांट, यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR