परळी : प्रतिनिधी
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता अर्जांची छाननी केली जात आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हीडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर व्हीडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना राक्षस म्हणून हिणवले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांत राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. नेत्यांची बैठका आणि सभांची तयारी सुरू आहे. परळी मतदारसंघातून करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर व्हीडीओ शेअर केला. यामध्ये त्या ढसढसा रडत आहेत. अर्ज बाद झाल्याबद्दल त्यांनी धनंजय मुंडे यांना खडेबोल सुनावले आहेत. करुणा मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीच राहिलेली नाही.
मी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. परळीत सुरू असलेल्या गुंडगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात मी आवाज उठवलेला होता. मला कोणाचा सपोर्ट नसताना आणि माझा मोठा पक्ष नसताना मी लढत होते. मला जनतेवर विश्वास आहे. त्यामुळेच मी परळीमधून अर्ज भरला होता, अशा भावना करुणा मुंडे यांनी व्यक्त केल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, तो राक्षस आहे. एक महिला स्वत:चे अस्तित्व गमावून, पतीचे अस्तित्व बनवत असते. तू माझा उमेदवारी अर्ज अवैध ठरवलेला नाही तर तू स्वत:ची हार लिहून ठेवलेली आहे. तू एका महिलेला भीत आहेस. इतिहास याचा साक्षीदार आहे. माझ्या मागे कोणत्याही पक्षाचा आधार नसताना पैशांचे बळ नसताना मी निवडणुकीला उभी राहत होते, असे म्हणत करुणा शर्मा यांना रडू कोसळले.