नवी दिल्ली : शंभर कोटींच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे ‘सूत्रधार’ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली आहे. अरविंद केजरीवाल तुरुंगात राहून सरकार चालवतील, असे ‘आप’च्या मंत्र्यांनी म्हटले आहे. यानंतर अरंिवद केजरीवाल यांनी जल मंत्रालयासंदर्भात काही निर्देश जारी केल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. जेलमधूनच दिल्ली सरकारचा कार्यभार पाहणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आधीच जाहीर केले होते. यानंतर आपण लवकरच तुरुंगाबाहेर येऊन दिलेली आश्वासने पूर्ण करणार, असा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठविलेला संदेश त्यांच्या पत्नी सुनीता यांनी वाचून दाखविला. त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. अरविंद केजरीवाल यांनी ईडी कोठडीतूनच कामकाज सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
अरविंद केजरीवाल यांनी जल मंत्रालयाशी संबंधित काही निर्देश जारी केले आहेत. दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी यांना अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या निर्देशांबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. यासंदर्भात आतिशी माहिती देणार असल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी, ईडीच्या कारवाईविरोधात अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तातडीची सुनावणी घेण्यासंदर्भात याचिका दाखल केली. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची याचिका फेटाळली.
दरम्यान, ईडीने कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. अटकेत असतानाही चौकशी होईल, याची शाश्वती नाही. कारण ईडीला चौकशी करायची नाही. ईडीला जे करायचे ते करू शकतात. मी पूर्ण तयारी केली आहे. जनतेला मला पाठिंबा आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी ठामपणे सांगितले होते.