पुणे : शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार याचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऋषिराज पवारचे विवस्त्र महिलेसोबत फोटो आणि व्हीडीओ काढून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ऋषिराज पवार याला मारहाण करत विवस्त्र करुन तिथे एका महिलेला आणून व्हीडीओ तयार करुन यासाठी १० कोटी मिळणार असल्याचे भाऊ कोळपेने सांगितल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आज या प्रकरणाबाबत आमदार अशोक पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मी उमेदवार असल्यामुळे मला बदनाम करण्याचे काम आहे. अशोक पवार असा पडू शकत नाही. मग कुठल्या षडयंत्र वापरून त्याला पाडायचे का अशी विचारधारा त्यांची असू शकते.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणामागचे मुख्य नाव बाहेर येईल. अशोक पवार आपल्याला पाडू शकत नाही हे त्यांना माहिती आहे. सगळी एमआयडीसीची माफिया गँग आहे. आरोपीने युवक चळवळीमधून ऋषिराज सोबत चार दिवस शिरूरमध्ये प्रचार केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे. त्यातून नाव बाहेर येईल मी आता नाव घेणे योग्य नाही असेही अशोक पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत.
अशोक पवार काय म्हणाले?
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. मग त्यामुळे राजकीय विषय त्यात येतो. अशोक पवार आपल्याला पडू शकत नाही हे सगळे एमआयडीसीची माफिया गँग आहे. मलिदा गँग आहे. काही थराला जाऊ शकते, म्हणून सामान्य जनता आमच्या पाठीमागे त्यांची आशीर्वाद आम्हाला मिळतात, म्हणून समोरच्यामध्ये भीती वाढली आहे. त्यांना काहीही करून आपल्या सत्ता मिळवायची आहे, एवढी उद्दिष्ट त्यांच्या मनामध्ये आहे. तो पक्षामध्ये नाही, त्याच्याकडे कोणतंही पद नाही. पण तो युवक चळवळीच्या माध्यमातून ऋषिराजसोबत प्रचाराला गेला. चार दिवस त्यांनी प्रचार केला शिरूर शहरांमध्ये. त्यावरून त्याचा हेतू साफ दिसत आहे त्याला फक्त जवळीक साधायची होती काल त्यांनी असंख्य फोन केले आपण आपल्याला मांडवगण फराटा येथे प्रचारासाठी जायचे आहे आणि या सर्व घटना त्या ठिकाणी झाल्या. त्याचा तपास पोलीस करत आहेत.
ऋषिकेश पवार काय म्हणाले?
माझी बदनामी करायची होती आणि माझी बदनामी करायची त्यांना दहा कोटीची सुपारी कोणीतरी दिली होती. असे त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले. त्यांनी मला सांगितले समोरच्या पार्टीने तुझा हा व्हीडीओ काढून व्हायरल करण्यासाठी दहा कोटी रुपये दिले आहेत आणि मग त्यांनी मला सांगितले. त्या दहा कोटीच्या ऐवजी तू १० कोटी देत असशील तर आम्ही तुझे व्हीडीओ डिलीट करू. त्यांना दुसरीकडून दहा कोटी येत असताना देखील त्यांनी माझ्याकडे पुन्हा एकदा दहा कोटी रुपयांची मागणी केली. त्यांनी तो व्हीडीओ काढला माझ्या बदनामीसाठी आणि यासाठी त्यांना समोरच्या पार्टीकडून दहा कोटी रुपये भेटणार होते हे देखील त्यांनीच सांगितले.
आता त्यांना दोन्हीकडून दहा-दहा कोटी मिळवायचे असतील असे त्यांना वाटत असेल किंवा त्यांच्या डोक्यात वेगळे काही असेल त्याबाबत मला काही माहिती नाही. पण, त्यांनी मला असे म्हटले तर तुम्ही दहा कोटी नाही दिले. तर तुम्हाला इथेच खल्लास करू तुमचा व्हीडीओ व्हायरल करू. मला त्या व्यक्तीबरोबर आधी संशय आलेला नव्हता. एखाद्या सर्वसामान्य घरातून आलेल्या व्यक्ती बाबत संशय कसा निर्माण होईल किंवा असे कसे वाटेल की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे, किंवा तो कोणत्या विचाराचा आहे. चेहरा बघून किंवा त्याच्या आधीच्या कृत्या मला माहित नव्हत्या. तो चार दिवस माझ्यासोबत होता. माझ्यासोबत त्यांनी काम केले आणि तसे करत त्यांनी बरोबर वेळ साधून मला एकट्याला घेऊन जाऊन असा विश्वासघात केला. तो मला म्हणाला एक सिक्रेट मीटिंग आहे. काहींना आपल्या सोबत यायचे आहे. त्याबाबत ही मिटींग आहे चला, ते ऐकून मी गेलो असे ऋषिकेश पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितला आहे.