पाटणा : नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडून एनडीएसोबत घरोबा केला, मात्र त्यांच्या नवीन सरकारमध्ये नाराजी दिसून येत आहे. नवीन सरकारमध्ये किंगमेकर ठरलेले जीतनराम मांझी यांनी त्यांच्या पक्षाला मिळालेल्या मंत्रिपदावरुन जाहीर नाराजी बोलून दाखवली.
मांझी यांनी सोमवारी सार्वजनिक कार्यक्रमामधून मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले, दरवेळी आमच्या पक्षाला एखादं मोठं मंत्रालय का दिलं जात नाही. जेव्हा मी मंत्री होतो तेव्हासुद्धा एससी, एसटी मंत्रालय दिलं गेलं होतं आणि आता मुलगा संतोष यांनाही हाच विभाग दिला.
२८ जानेवारी रोजी बिहारमध्ये सत्ताबदल झाला. नितीश कुमार यांनी तब्बल नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपच्या कोट्यातून दोघांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे. यामध्ये सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांचा समावेश आहे. यांच्यासह आणखी पाच जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
सोमवारी जाहीर कार्यक्रमात बोलताना जीतनराम मांझी म्हणाले की, मी मंत्री होतो तेव्हासुद्धा मला हेच खातं देण्यात आलेलं होतं आणि आता माझ्या मुलालाही हाच विभाग मिळाला आहे. आम्ही रस्ते विकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं सांभाळू शकत नाहीत का?