नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळला जाणार आहे. राजकोट येथील सामना जिंकल्यामुळे कसोटी मालिकेत भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. तर चौथ्या सामन्यासाठी दोन्ही संघांची तयारी सुरू झाली आहे. रांची येथे खेळला जाणारा सामना जिंकून भारताला मालिका जिंकायची आहे.यासोबतच भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अनुभवी फलंदाज केएल राहुल पुढील सामन्यात खेळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणा-या चौथ्या कसोटीत राहुल पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. क्वाड्रिसेप्सच्या ताणामुळे राहुल दुस-या आणि तिस-या कसोटीत खेळू शकला नाही. हैदराबादमधील पहिल्या कसोटीत दमदार फलंदाजी केल्यानंतर तो क्वाड्रिसेप्सच्या ताणामुळ संघाबाहेर गेला होता. मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून राची येथील सामन्यात खेळू शकतो असे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान , राहुल संघात परतला तर रजत पाटीदार प्लेइंग- ११ मधून बाहेर पडू शकतो. रजतला विशाखापट्टणम कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. त्याने पहिल्या डावात ३२ आणि दुस-या डावात ९ धावा केल्यानंतर तो बाद झाला होता. त्यानंतर त्याला राजकोटमध्ये आणखी एक संधी देण्यात आली होती. मात्र रजत पुन्हा एकदा अपयशी ठरला. पहिल्या डावात त्याला केवळ पाच धावा करता आल्या होत्या. दुस-या डावात शुन्यावर बाद झाला होता. यामुळे रजतला संघाबाहेर बसावे लागू शकते. यासोबतच अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहलही चौथ्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते.