कोल्हापूर : प्रतिनिधी
विशाळगडाच्या पायथ्याशी जमावाने केलेल्या हिंसाचारानंतर राज्यातील विरोधकांनी महायुती सरकारला लक्ष्य केले आहे. या हिंसाचाराला भाजप जबाबदार असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे.
आमदार सतेज पाटील यांनी दीड महिन्यापूर्वी कोल्हापुरात विधानसभेच्या आधी राज्यात दंगल घडविण्याचा डाव भाजपचा असू शकतो, असे विधान केले होते. त्या वक्तव्यावरून सध्या जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विशाळगडाच्या घटनेवरून राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे.
दरम्यान, महायुतीच्या नेत्यांनी कोल्हापुरातील स्थानिक राजकारण लक्षात घेता विशाळगडाच्या घटनेवरून काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना वेढा घातला आहे. घटनेनंतर तीन दिवसांनंतर बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने यांनी सतेज पाटलांच्या चौकशीची मागणी केली आहे.
पाटील यांनी दीड महिन्यापूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर महायुतीतील नेत्यांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर आरोप करत आणि स्थानिक राजकारण डोळ्यांसमोर ठेवून त्यांनाच चौकशीच्या फे-यात अडकवण्याची रणनीती आखली जात आहे. घटनेनंतर तीन दिवसांनंतर एकापाठोपाठ एक अशा तीन पत्रकार परिषदा घेत सतेज पाटील यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रतिक्रिया देताना म्हणाले, कोल्हापुरात वारंवार घडणा-या दंगलीबाबत सर्वांच्याच चौकशीची गरज असल्याचे म्हटले. त्यामुळे त्यांचा सतेज पाटील यांनी दंगलीबाबत केलेल्या वक्तव्याकडे रोख असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सतेज पाटील चौकशीच्या फे-यात येण्याची शक्यता आहे.
राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील पाटील यांच्यावर निशाणा साधला, माजी पालकमंत्री हे अतिक्रमण केलेल्या लोकांना मदत करायला गेल्याचे ढोंग करत आहेत. ते मागेच दंगल होणार दंगल होणार असल्याचे म्हणाले होते. या सगळ्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर खासदार धैर्यशील माने यांनी हल्लेखोर कुठून आले? ते कोण होते? याची चौकशी झाली पाहिजे. तसेच दंगल होणार असे वक्तव्य ज्यांनी केली त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली.