नागपूर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांची पोलिस कोठडीत तब्येत बिघडली आहे. कुणाल राऊत यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांना मेयो रुग्णालयात म्हणजे इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. कुणाल राऊत यांना बुधवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिस कोठडीत पोटदुखीच्या तक्रारीनंतर कुणाल राऊत यांना मेयोमध्ये सोमवारी रात्री उशिरा उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने सोमवारीच कुणाल राऊत यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या फलकांचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयाने कुणाल राऊत यांना दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली होती.
त्यामुळे बुधवारपर्यंत त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली असताना त्यांची तब्येत बिघडली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना नागपूर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. कुणाल राऊत हे राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत. कुणाल राऊत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. कुणाल राऊत आणि त्यांच्या सहका-यांनी शनिवारी संध्याकाळी नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान मोदींच्या पोस्टर्सवर काळे फासले होते. त्यानंतर पोलिसांनी आता त्यांना अटक केली आहे.
भाजपकडून जोरदार आंदोलन
पंतप्रधानांच्या पोस्टरला काळे फासल्या प्रकरणी भाजपकडून सोमवारी जोरदार आंदोलन करण्यात आले. भाजपने हे प्रकरण उचलून धरत सोमवारी जिल्हा परिषदेच्या समोर जोरदार आंदोलन केले. नागपूर जिल्हा परिषदेसमोर रस्त्यावरील वाहतूक भाजप कार्यकर्त्यांनी रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केले. नागपूरच्या जीपीओ चौक आणि उच्च न्यायालयाला जोडणारा हा रस्ता भाजप कार्यकर्त्यांनी अडवून धरला होता.