32.4 C
Latur
Saturday, February 1, 2025
Homeमुख्य बातम्यालक्ष्मी प्रसन्न...... १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

लक्ष्मी प्रसन्न…… १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आतापर्यंतचा आठवा आणि मोदी ३.० सरकारचा पहिला पूर्ण (२०२५-२६) अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत तब्बल १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर १ लाख कोटींचा बोजा पडणार आहे. मात्र, हा बोजा स्वीकारत केंद्राने मध्यमवर्गाला मोठी भेट दिली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली. त्यांचा हा सलग ८ वा अर्थसंकल्प ठरला. या अर्थसंकल्पात दुपारी १२ पर्यंत त्यांनी कोणतीही आकर्षक घोषणा केली नव्हती. पण १२ वाजून १२ मिनिटांनी केलेल्या घोषणेने सगळा नूर पालटला. यावेळी त्यांनी नव्या कर रचनेनुसार १२ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. पण जुन्या कर व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर एक रुपयाही कर भरण्याची आवश्यकता नाही. त्याचवेळी तुमचे उत्पन्न १२ लाख ७५ हजार रुपये तरीही शून्य कर आकारला जाणार आहे. कारण ७५००० रुपयांच्या मानक वजावटीचा (स्टँडर्ड डिडक्शन) लाभ मिळणार आहे. याचाच अर्थ १२ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही.
आतापर्यंत ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नव्हता. मानक वजावट समाविष्ट केल्यानंतर ही रक्कम ७.७५ लाख रुपये होते. नव्या कररचनेनुसार ४ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असून, ४ ते ८ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के, ८ ते १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के, १२ ते १६ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर १५ टक्के, १६ ते २० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के आणि २० ते २४ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के आणि २४ लाखांवरील उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येणार आहे. तसेच ७५ हजार रुपयांपर्यंत स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा मिळेल. या घोषणेमुळे मध्यमवर्गाला सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांच्या आत असल्यास कोणताही कर द्यावा लागणार नाही.

१२ लाख उत्पन्नावर ८० हजारांची बचत
नवीन कर स्लॅबनुसार १२ लाख रुपयांपर्यंत कमाई केल्यास ८० हजार रुपयांची बचत होऊ शकणार आहे. कारण या अगोदर १२ लाखांच्या उत्पन्नावर ८० हजार रुपये टॅक्स भरावा लागायचा. तसेच १८ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल तर ७० हजार रुपयांची २५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १.१० लाख रुपयांची बचत होणार आहे.

पुढील आठवड्यात नवीन कर विधेयक
अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमधील आतापर्यंतची मोठी घोषणा करतानाच नवीन कर विधेयकाची घोषणा केली, जे पुढील आठवड्यात संसदेत सादर केले जाणार आहे.

नवीन टॅक्स स्लॅब
उत्पन्न कर
० ते ४ लाख : शून्य कर
४ ते ८ लाख : ५ टक्के
८ ते १२ लाख : १० टक्के
१२ ते १६ लाख : १५ टक्के
१६ ते २० लाख : २० टक्के
२० ते २४ लाखांवर : ३० टक्के

जुनी कर व्यवस्था
० ते २.५ लाख : शून्य कर
२.५ लाख ते ५ लाख : ५ टक्के
५ लाख ते १० लाख : २० टक्के
१० लाखांपेक्षा जास्त : ३० टक्के

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR