26.7 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeमहाराष्ट्र‘लालपरी’ महागली

‘लालपरी’ महागली

तिकीटात १४.९५ टक्के दरवाढ रिक्षा-टॅक्सीचीही भाडेवाढ

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील प्रवाशांसाठी एक सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेससह खासगी वाहनांचा प्रवास महागणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून प्रलंबित असलेल्या एसटी प्रवासाच्या भाडेवाडीला मंजूरी देण्यात आली आहे. एसटीच्या तिकीटात १४.९५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास आता महागणार असून एसटी दरवाढीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्याआधी एसटी दरवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावर आता महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. या बैठकीत एसटी बसच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार एसटीच्या तिकीटात १४.९५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह मुंबईमधील प्रवाशांसाठी हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. हे नवे दर कधीपासून लागू होणार याबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नव्हती, मात्र आता हे नवे दर आजपासूनच लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाडेवाढ अनिवार्य होती?
दुसरीकडे राज्य परिवहन खात्याने एसटी दरवाढ केल्यानंतर मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढही होणार आहे. गेल्या काही वर्षापासून टॅक्सी आणि रिक्षा यांची भाडे वाढली नाहीयेत त्यामुळे ३ रूपयांनी भाडेवाढ करण्याची मागणी होती. ही भाडेवाढ होणे गरजेचे आहे नाहीतर आमचे जगणे मुश्किल होईल असे टॅक्सी रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. त्यानुसार आता टॅक्सी आणि रिक्षाचाही प्रवास महागला आहे.

खासगी टॅक्सीची ३ रुपयांनी दरवाढ
टॅक्सी आणि रिक्षामध्ये तीन रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. टॅक्सी सध्याचे दर हे २८ रुपये आहेत तर आता नव्या दरवाढीनुसार ते ३१ रुपये होतील. तसेच रिक्षाचे सध्याचे दर हे २३ रुपये असून नव्या दरवाढीनुसार २६ रुपये मोजावे लागणार आहेत. दोन फेब्रुवारीपासून ही भाडेवाढ होईल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR