अमरावती : प्रतिनिधी
मुंबईतील धारावी येथील १ लाख कोटी रुपयांची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठी भाजपने आमचे महाराष्ट्रातील सरकार पाडले. आमदारांची खरेदी करण्यासाठी जी बैठक घेण्यात आली, त्या बैठकीला अदानींसमवेत गृहमंत्री अमित शाहदेखील उपस्थित होते, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दुपारी धामणगाव रेल्वे येथील प्रचार सभेत केला.
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार जमिनी बळकावण्यासाठी पाडण्यात आले. आमदारांची खरेदी करून सरकारे पाडा, असे संविधानात कुठेही लिहिलेले नाही. पण हे सरकार चोरीचे आहे. आमदारांची खरेदी करण्यासाठी ५०-६० कोटी रुपये देण्यात आले. हे पैसे फुकट वाटले जात नाहीत. याचे आदेश कुणी दिले, धारावीच्या जमिनीचा व्यवहार कसा झाला, हे संपूर्ण देशाला ठाऊक आहे. गरीब लोकांची जमीन अदानींना सोपविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारची चोरी केली.
राज्यात जातनिहाय जनगणना होईल, असे सांगताना राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेमुळे विविध संस्थांमधील आदिवासी, दलित आणि ओबीसींची स्थिती स्पष्ट होईल, असे म्हटले. आम्ही ५० टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करू, पंतप्रधान मोदींने ते करून दाखवावे, असे जाहीर आव्हानदेखील त्यांनी दिले. मोदी गरिबांना मान-सन्मान देण्याविषयी बोलतात, पण शेतक-यांचे कर्ज माफ करत नाहीत, अशी टीकादेखील राहुल गांधी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडक २५ अब्जाधिशांसाठी काम करीत आहेत. त्यांना शेतकरी, शेतमजूर, गरिबांशी काहीही घेणे देणे नाही. कारण या अब्जाधिशांनी त्यांच्यासाठी पैसा खर्च केला आहे. माझी बदनामी करण्यासाठी कोट्यवधी रुपये ओतले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
मोदींना विस्मरणाचा आजार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विस्मरणाचा आजार झाला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आम्ही संविधानाच्या रक्षणाविषयी सातत्याने बोलत आहोत. आता ते राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात आहेत, असे म्हणत आहेत. आम्ही उपस्थित केलेले मुद्दे ते आपल्या भाषणात मांडत आहेत. आम्ही ५० टक्के आरक्षणाची मर्यादा तोडू असे सांगितले होते. पण नरेंद्र मोदी ही मर्यादा वाढवू इच्छित नाहीत. आम्ही जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला. ते उद्या म्हणतील राहुल गांधी जातनिहाय जनगणनेच्या विरोधात आहेत.