नगर : नगर लोकसभा निवडणूक झाली असली तरी चार जूनपर्यंत दोन्ही उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. भाजप उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे दोघेही आपल्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र, मतदानानंतर निलेश लंके यांच्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी ईव्हीएम ठेवलेल्या एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामाभोवती तळ ठोकून आहेत. ईव्हीएम खुले होईपर्यंत येथेच पदाधिका-यांचा पहारा असणार आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी ३ मे रोजी मतदान झाले. या दिवशी नगर दक्षिणमध्ये तणाव होता. नगर दक्षिण मतदारसंघात मतदान संवेदनशील पातळीवर झाले. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे १५ पदाधिकारी मतदान झालेले ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही स्ट्राँग रूममध्ये तळ ठोकून आहेत.
हे पदाधिकारी तीन शिफ्टमध्ये पाच-पाचच्या संख्येने स्ट्राँग रूममधील सीसीटीव्हीसमोर बसून असतात. सीसीटीव्हीमधील हालचाली टिपतात. ईव्हीएमच्या गोदामाभोवती खडा पोलिस बंदोबस्त असला तरी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सीसीटीव्ही स्ट्राँग रूममध्ये डोळ्यात तेल घालून हालचालींवर लक्ष देत आहेत.