पुणे : प्रतिनिधी
येथील घोडेगावमधील निवासी आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा हा प्रकार आहे. परंतु संबंधित ठेकेदारावर अजून कोणतीही कारवाई केली गेली नाही. या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या नाष्ट्यातील दुधात जिवंत अळ्या आढळून आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे पालक धास्तावले आहेत. या घटनेनंतर बिरसा ब्रिगेड आक्रमक झाली आहे. त्यांनी या प्रकरणी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील इंग्रजी माध्यमाच्या आदिवासी निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना नाश्त्यात नियमित दूध दिले जाते. या दुधाचे वाटप करताना त्यात अळ्या आढळून आल्याने खळबळ पसरली. दीड महिन्यापूर्वी आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळून आल्या होत्या.
त्यानंतर आता पॅकिंगमध्ये दिल्या जाणा-या दुधात अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असून हा खेळ कोण खेळत आहे, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.