चंदीगड : पंजाब-हरियाणा हायकोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष वकील विकास मलिक यांना चंदीगड पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी पंजाब आणि हरियाणाच्या बार कौन्सिलनेही विकास मलिक यांचा परवाना देखील तात्पुरता निलंबित केला होता. १ जुलै रोजी चंदिगड पोलिसांनी विकास मलिक आणि इतरांविरुद्ध उच्च न्यायालयातील वकील रणजित सिंग यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. मलिक यांच्या अटकेला चंदीगड पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-याने ही दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदीगड पोलिस आज विकास मलिक यांना जिल्हा न्यायालयात हजर करू शकतात, विकास मलिकवर हायकोर्ट बार कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही कॅमे-यांचा डीव्हीआर गहाळ केल्याचा ही आरोप आहे. एवढेच नाही तर मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोपही आहेत. मात्र, सध्या या आरोपांबाबत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. बार कौन्सिलची शिस्तपालन समितीही मलिकशी या संबंधित प्रकरणांची सुनावणी करत आहे.