29 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रन्यायासाठी वकील झाले आक्रमक

न्यायासाठी वकील झाले आक्रमक

नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर बाटल्या फेकल्या आढाव वकील दाम्पत्यास न्याय देण्याची मागणी

नगर : राहुरीत निर्घृण खून झालेल्या आढाव वकील दाम्पत्याच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, आरोपींविरुद्ध ‘मोक्का’अन्वये कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील वकिलांनी आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य गेट बंद असल्याने वकील आक्रमक झाले होते. महिला वकिलांसह अनेक वकील गेटवर चढले व त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने बाटल्या फेकल्या. या मोर्चामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित गट) आमदार संग्राम जगताप सहभागी होते.

महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा करावा, राहुरीतील गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालयपुढे चालावा, खटला चालवण्यासाठी सरकारतर्फे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशाही मागण्या मोर्चेकरी वकिलांनी केल्या. राहुरीतील मानोरी गावातील वकील राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांचा पंधरा दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला. आढाव दाम्पत्याचे पक्षकार असलेली व्यक्तीच या गुन्ह्याची सूत्रधार असल्याचे आढळले. खुनाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) यापूर्वीच वर्ग करण्यात आला आहे. तत्पूर्वीच स्थानिक पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. मात्र वकील संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी जिल्हाभरातील वकिलांनी आंदोलन पुकारले होते. आज जिल्ह्यातील वकिलांनी मोर्चा काढला. मोर्चात मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले होते.

जिल्हाधिका-यांना निवदेन
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला तेव्हा कार्यालयाच्या गेटवर मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बंदोबस्त तैनात होता मात्र पोलिस अल्पसंख्येने उपस्थित होते. सर्व वकिलांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळावा, या मागणीसाठी वकील आक्रमक झाले होते. महिला वकिलांसह अनेकजण गेटवर चढले व त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या. नंतर पोलिसांनी तातडीने प्रत्येक तालुक्यातील वकील संघटनांच्या पदाधिका-यांना प्रवेश देत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घडवून आणली. वकिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. त्यानंतर वातावरण शांत झाले. आमदार सत्यजित तांबे यांनीही मोर्चेकरी वकिलांची भेट घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR