मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार हे आज स्पष्ट झाले. महायुतीच्या पाच उमेदवारांव्यतिरिक्त एका अपक्षाने अर्ज दाखल केला असला तरी त्यावर सूचक, अनुमोदक म्हणून दहा आमदारांच्या स्वाक्ष-या नसल्याने तो छाननीत बाद ठरणार हे नक्की आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने संजय खोडके यांना संधी दिली असून त्यांच्या पत्नी विधानसभेच्या सदस्या आहेत. पती-पत्नी एकाच वेळी विधीमंडळाचे सदस्य होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भाजपचे आमदार प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड तसेच, शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमशा पाडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे पाच विधानपरिषदेचे सदस्य विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या पाच जागांसाठी २७ मार्चला पोटनिवडणूक होत आहे. या पाचही जागांसाठी स्वतंत्र निवडणूक होत असल्याने संख्याबळानुसार सर्व जागा महायुतीला मिळणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे विरोधी पक्ष या निवडणुकीपासून लांब आहे.
भाजपाने या निवडणुकीसाठी नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी, दादाराव केंचे व संजय केणेकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. तर राष्ट्रवादीने संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्या पत्नी सुलभा खोडके अमरावतीच्या आमदार आहेत. प्रथमच पतीझ्रपत्नी एकाच वेळी दोन सभागृहाचे सदस्य असणार आहेत. संजय खोडके यांना साडेपाच वर्षाचा कालावधी मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव जाहीर केले. या सर्वांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. याशिवाय अशोक म्हेत्रे नावाच्या अपक्षाने अर्ज दाखल केला असला तरी त्यांच्या अर्जावर १० आमदारांच्या स्वाक्ष-या नसल्याने तो अर्ज छाननीत फेटाळला जाणार हे नक्की आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर बुधवारी उपरोक्त पाच जणांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा होईल.