19.4 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या सहा आमदारांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द

महायुतीच्या सहा आमदारांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द

मुंबई : महायुतीच्या सहा आमदारांचे विधान परिषदेमधील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही नावाचा समावेश आहे. बावनकुळे यांच्यासह सहा आमदारांच्या नावाची सचिवालयातून अधिसूचना काढण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सहा आमदार विजयी झाल्याने त्यांना आता विधान परिषदेत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. यामध्ये महायुतीच्या चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर या विधान परिषदेच्या आमदारांचा समावेश आहे.

भाजपाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपुरातील कामठी विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवल्याने ते आता विधानसभेतील आमदार बनले आहेत. तर भाजपाचे प्रवीण दटके यांनी नागपूर मध्य विधानसभेतून निवडणूक जिंकली असून भाजपाचेच गोपीचंद पडळकर यांनीही जत विधानसभा मतदारसंघातून विजयाचा झेंडा फडकावला. तर दुसरीकडे लातूर ग्रामीण विधानसभेतून भाजपाचे रमेश कराड यांनी बाजी मारली.

तसेच, शिवसेना शिंदे गटाचे आमश्या पाडवी यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून तर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. त्यामुळे आता हे सहाही विधान परिषदेतील आमदार विधानसभेत जाऊन बसणार आहेत. त्यामुळे नियमानुसार, एकावेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही. त्यामुळे २३ नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR