25.7 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeराष्ट्रीयमायावतींचा एकला चलो रे!

मायावतींचा एकला चलो रे!

नवी दिल्ली : आगामी २०२४ च्या निवडणुकीसाठी एकीकडे भाजपा जोरदार तयारी करत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षही इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोदींचा पराभव करण्याची रणनीती आखत आहेत. त्यातच इंडिया आघाडीला आज मोठा धक्का बसला आहे. कारण बसपा प्रमुख मायावती यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी वाढदिवसानिमित्त पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मायावती यांनी भाजपासह समाजवादी पार्टी आणि काँग्रेसवरही निशाणा साधला.

मायावती म्हणाल्या की, आम्ही उत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवून सरकार बनवले होते. त्याचा आधार घेत येत्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू. आम्ही कुठल्याही पक्षासोबत युती किंवा आघाडी करणार नाही. आमचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतो कारण पक्षाचे नेतृत्व एका दलिताच्या हाती आहे. आघाडी केल्यानंतर बसपाची मते विरोधी पक्षांना मिळतात परंतु दुस-याची मते आम्हाला मिळत नाही. ९० च्या दशकात आमच्यासोबत झालेल्या आघाडीचा समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला फायदा झाला होता. ईव्हीएममुळे फेरफार होत असल्याने बीएसपीला नुकसान होत आहे. ईव्हीएम मतदान बंद केले पाहिजे. आघाडीचे आम्हाला नुकसान होते. त्यामुळे देशातील बहुतांश पक्ष बीएसपीसोबत आघाडी करायला बघतात. परंतु निवडणुकीनंतर आम्ही आघाडीचा विचार करू असे त्यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी बसपासोबत चाललेल्या चर्चेवर कठोर भूमिका घेतली. जर मायावती आघाडीत आल्या तर त्यांच्या पक्षाचा अजेंडा स्पष्ट असायला हवा असं अखिलेशने म्हटले. त्यावर अखिलेश यादव हा सरडा आहे. वेळोवेळी रंग बदलतो अशा शब्दात पलटवार केला. काँग्रेस, भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांचा विचार धार्मिक आहे. दलित आणि मागासवर्गीय समाजाला त्यांच्या पायावर उभे राहताना हे पक्ष पाहू शकत नाही. आरक्षणाचा पूर्ण लाभही घेऊन देत नाही असा आरोप मायावती यांनी पक्षावर केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR