मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे आज पहाटे ३ वाजता निधन झाले. ८६ वर्षीय मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारासाठी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय तसेच महाराष्ट्राचे पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री अशी मनोहर जोशी यांची ओळख होती.
बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना शिवसेना-भाजपा युतीच्या राज्यातील पहिल्या विजयानंतर १९९५ साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. मात्र बाळासाहेबांनी हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या सल्लाने घेतल्याचा दावा ‘आधारवड’ या पुस्तकात करण्यात आला आहे. भाजप पेक्षा ८ जागा जास्त निवडून आणणा-या शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचे गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री असतील असे ठरले होते. आता प्रश्न होता तो, शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार याचा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर आधीच जाहीर केलं होतं, “मी मुख्यमंत्री होणार नाही. पण, मला उठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं कि बसणारा मुख्यमंत्री हवा आहे. पदावर कोणीही बसो सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याच हातात राहील.
बाळासाहेब स्वत: मुख्यमंत्री होणार नाहीत म्हटल्यावर मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांची नावं चर्चेत आली. हे दोघे मामा भाचे. शिवसेनेच्या स्थापनेच्या काळापासून ते बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत होते. मनोहर जोशी आणि सुधीर जोशी एकेकाळी आपल्या मोटारी भाड्याने देत होते. त्यातूनच त्यांची आणि बाळासाहेबांची ओळख झाली होती. मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांसाठी ड्रायव्हरचं काम केलेलं होतं. ठाकरे माझा ड्रायव्हर एलएलबी आहे असं देखील गंमतीने म्हणत. मनोहर जोशी यांची राजकीय कारकीर्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सामील होऊन सुरू झाली आणि नंतर ते शिवसेनेचे सदस्य झाले. १९८० च्या दशकात मनहर जोशी शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले.
मनोहर जोशी हे त्यांचे संघटन कौशल्य आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखले जात होते. मनोहर जोशी यांनी १९७० च्या दशकात शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते १९७६ ते १९७७ या काळात मुंबईचे महापौरही होते. मनोहर जोशी यांनी १९९५-१९९९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. यानंतर, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना २००२-०४ साठी लोकसभा अध्यक्ष बनवण्यात आले. मनोहर जोशी मुंबई सेंट्रल मतदारसंघातून लोकसभेचे खासदार झाले. राज्यसभेचे खासदार म्हणूनही त्यांनी सहा वर्षे काम केले.