मुंबई : गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळू दे अशी प्रार्थना केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की गणरायाचे आगमन झालंय. आपल्या आयुष्यात पण आनंद, समाधान, समृद्धी येवो, सर्वांना सुबुद्धी मिळो हीच प्रार्थना. प्रत्येक गणोशोत्सव एक नवी ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह घेऊन येतो. सगळीकडे मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होते. गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचे दर्शन घडते. सगळ्या जगाचे महाराष्ट्राकडे लक्ष लागलेले असते. या काळात महाराष्ट्राच्याच नाही तर देशात आणि विदेशातही मराठी माणसांत उत्साह-जोश दिसतो.
हे शेतक-यांचे, कष्टक-यांचे सरकार आहे. यंदा राज्यात सगळीकडे खूप चांगला पाऊसही झाला आहे, त्यामुळं शेतकरी बांधवामध्येही उत्साह आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. पण सरकार पूर्णपणे शेतक-यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे शेतक-यांना सगळी मदत केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच, गणेशाची मनोभावे सेवा करतानाच, आपण सामाजिक बांधिलकची जाणीव ठेवूया. गरजू लोकांना मदतीचा हात द्या. आपण पर्यावरणाची काळजी घेणे पण गरजेचे आहे. आपले सणवार हे निसर्गाला पूरक असे असतात. त्यामुळे निसर्गाचे जतन-संवर्धन होईल, ही बाब लक्षात घेऊन सण साजरे करावेत असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
राज्य शासनाने अनेक चांगल्या सामाजिक योजना सुरु केल्या आहेत, देशपातळीवर त्याचे कौतुक होते आहे. शेतकरी युवक महिला सर्वच स्तरातील घटकांचा विचार करून शासन सगळ्यांना सक्षम करण्यासाठी पाठबळ देत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना म्हणजे राज्यातल्या भगिनींच्या आयुष्यात क्रांती आणणारी योजना ठरत आहे. या बहिणींचे आशीर्वादही आम्हाला मिळत आहेत. परदेशी गुंतवणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर येत आहे. देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा एक ट्रिलियन डॉलर्सचा वाटा असणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.