सोलापूर : प्राधान्यक्रम देऊन किरकोळ विषय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सोडवू तसेच निवडणूक संपल्यानंतर निवड श्रेणीसारखे विषय मार्गी लावू, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी सोमवारी जिल्हा परिषदेतील ‘शिवरत्न’ सभागृह येथे जिल्ह्यातील विविध संघटनांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी शिक्षक संघटनांच्या अध्यक्षांना आश्वासन दिले.
याप्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, शिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष म. ज. मोरे, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड, आदर्श शिक्षक समितीचे अध्यक्ष अकुंश काळे, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे, अल्पसंख्याक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव हजरत शेख, प्रोटॉन शिक्षक संघटनेचे राज्य सदस्य सुधीर कांबळे, एकल शिक्षक मंचचे राज्य सदस्य विजय वाघमारे, शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कोकरे आदी उपस्थित होते. यावेळी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पात्र शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी मंजूर करा, अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडश्रेणीचा लाभ द्या, शाळेमध्ये
मुख्याध्यापक पदभार घेण्याविषयी अनेकांमध्ये संभ्रमावस्था आहे त्याविषयी सुस्पष्ट आदेश काढावा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे अनुदान स्पर्धेपूर्वी द्यावे, जिल्हा स्तरावर सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना किमान सहभाग प्रमाणपत्र देण्यात यावे, वैद्यकीय अग्रीम धनाची रक्कम बीडीओंना पूर्वीप्रमाणेच त्वरित द्यावे, अशा विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, अशी विनंती केली.