मुंबई : आज सकाळपासून भारतीय आयुर्विमा महामंडळाचे शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर एम-कॅप 5.8 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. आज कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक वाढीसह व्यवहार करत आहेत. आज शेअर्स 919.45 रुपयांसह 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत.
शेअर्सच्या वाढीनंतर LIC आता सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. आता LIC चे बाजार भांडवल स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) पेक्षा जास्त आहे.
आज LIC चे शेअर्स वाढीसह 902.35 रुपयांवर व्यवहार करत आहेत. त्याच बरोबर एसबीआयचे शेअर्स कमी होऊन 624.40 रुपयांवर व्यवहार करत आहेत. गेल्या वर्षी, नोव्हेंबर 2023 मध्ये, एलआयसीच्या शेअरची किंमत 50 टक्क्यांहून अधिक वाढली होती. मार्च 2023 मध्ये लिस्ट झाल्यानंतर एलआयसीच्या शेअर्सवर दबाव होता.
गेल्या पाच दिवसांत भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शेअर्समध्ये साडेसात टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच सरकारचा हिस्सा महिनाभरात सुमारे 13 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या सहा महिन्यांत शेअर 45 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. शेअर्समध्ये नुकत्याच झालेल्या या नेत्रदीपक वाढीमुळे LIC चे मार्केट कॅप देखील प्रचंड वाढले आहे.