अकोले : नाशिकहून पुण्याकडे दारू घेऊन चाललेला ट्रक पहाटे उलटला. दारूचा ट्रक उलटल्याची माहिती कळताच परिसरातील ग्रामस्थांची धावपळ सुरू झाली. ग्रामस्थांनी पहाटेच तब्बल अकराशे बॉक्स लंपास केले. ही घटना सकाळी आठ वाजता संगमनेर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
नाशिकमधील दिंडोरी येथून दारुचे तेराशे बॉक्स घेऊन ट्रक पुण्याला निघाला होता. रस्ता चुकल्याने सिन्नर येथील वडगाव मार्गे अकोले तालुक्यातील गणोरे रस्त्याने ट्रक आला. रात्री साडेतीन वाजता हा ट्रक उलटला.
त्याचा मोठा आवाज होताच आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी पोहोचले, तर काही जणांनी आपल्या मोटारसायकल, कारमधून हे बॉक्स पळविले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी बॉक्स आणून द्या; अन्यथा आरोपी करावे लागेल, असे सांगितले. त्यामुळे काहींनी दारूचे बॉक्स आणून दिले. मात्र, अजूनही काही बॉक्स येणे बाकी असल्याने संगमनेर, अकोले पोलिस, तसेच दारू उत्पादन शुल्क अधिकारी तपास करत आहेत.
तेराशे बॉक्स घेऊन ट्रक दिंडोरी नाशिक येथून पुणे येथे चालला होता. हा माल कायदेशीर कंपनीचा आहे. ट्रक उलटला, त्यातील बॉक्स चोरीला गेले असून आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करून तपास करत आहोत.