27.8 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeराष्ट्रीयदेशातील सर्वांत लांब बोगदा मालवाहतुकीसाठीचा खुला

देशातील सर्वांत लांब बोगदा मालवाहतुकीसाठीचा खुला

मोदींनी रेल्वे गाड्यांना दाखविला हिरवा झेंडा दुर्गम राज्याला उर्वरित देशासोबत जोडले

श्रीनगर : देशातील सर्वांत लांब मालवाहतुकीसाठीचा बोगदा मंगळवारी अखेर खुला झाला. उधमपूर-श्रीनगर- बारामुल्ला रेल लिंकचा भाग असलेल्या या बोगद्यातून काश्मीर खो-यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आज या गाडीला हिरवा कंदील दर्शविला. पंतप्रधान मोदींनी एकाच वेळी विजेवर धावणा-या दोन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखविला.

यातील एक गाडी ही श्रीनगर ते सांगल्दान आणि दुसरी सांगल्दान ते श्रीनगर दरम्यान धावल्याची माहिती रेल्वेच्या अधिका-यांनी दिली. पंतप्रधानांच्या हस्ते ४८.१ किलोमीटर लांबीच्या बनिहाल-खेरी-सुंबेर-सांगल्दान या विभागाचेही उद्­घाटनही करण्यात आले. बनिहाल-खेरी-सुंबेर-सांगदाल विभागामध्ये अकरा बोगद्यांची उभारणी करण्यात आली असून त्यातील ‘टी-५०’ या बोगद्याच्या निर्मितीचे काम खूप आव्हानात्मक होते. या बोगद्याचे काम हे साधारणपणे २०१० मध्ये सुरू झाले त्यानंतर हा बोगदा पूर्ण व्हायला चौदा वर्षांचा अवधी लागला.

जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे अशी ओळख असलेल्या भारतीय रेल्वेने सध्या जम्मू आणि काश्मीर सारख्या दुर्गम राज्याला उर्वरित देशासोबत जोडण्याच्या कामाला प्राधान्यक्रम दिला होता. या प्रकल्पाअंतर्गत भारतीय रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा आकाराला आणला. भारतीय रेल्वे मार्गावरचा हा सर्वात लांब बोगदा ठरला आहे. जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील संबर आणि अर्पिंचला स्टेशन्सना हा बोगदा जोडतो.

बोगद्याची लांबी सुमारे १३ किलोमीटर
या बोगद्याची लांबी १२.७७ किलोमीटर एवढी असून तो ‘टी-५०’ या नावानेही ओळखला जातो. हा बोगदा खरी- सुंबेर सेक्शनचाच भाग आहे. उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीप्रमाणे आता बारामुल्ला ते सांगल्दानदरम्यान रेल्वे धावू शकेल. ही गाडी बनिहाल मार्गे धावणार आहे.

सुरक्षाविषयक उपाययोजना
आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. ‘टी-५०’ या मुख्य बोगद्यालाच समांतर असा एक बोगदा तयार करण्यात आला असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना त्यातून स्वत:ची सुटका करून घेता येईल.

आत पाण्याची सोय
या बोगद्यामध्ये अचानक एखाद्या वाहनाला आग लागली तर ती विझविता यावी म्हणून दोन्ही बाजूला पाण्याचे पाइप बसविण्यात आले आहेत. या पाईपला ३७५ मीटरच्या अंतराने वेगळ्या व्हॉल्वची सोय करण्यात आली असून त्यातून आगीवर पाण्याच्या फवा-याचा मारा करण्यात येईल. सध्या बारामुल्ला ते बनिहालदरम्यान आठ विजेवरील गाड्या धावतात. त्यातील चार गाड्यांचा टप्पा हा सांगल्दानपर्यंत वाढविण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR