नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये काल भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगला. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीमुळे भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला. चालू स्पर्धेत सलग दुस-या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आपल्या संघाच्या कामगिरीवर चांगलाच निराश झाला असून, आम्ही एकापाठोपाट विकेट गमावल्यामुळे आमच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला, असे बाबर म्हणाला.
न्यूयॉर्कमधील नासाऊ कौटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने १९ षटकात १० गडी गमावून ११९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून ११३ धावाच करू शकला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसमोर पाकिस्तानचे महान फलंदाज फिके पडले. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ३.५० च्या इकॉनॉमी रेटने केवळ १४ धावा दिल्या आणि ३ विकेट पटकावल्या. यामुळे सामना भारताच्या बाजूने वळला. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.
या विजयासह भारतीय संघ ‘अ’ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.तर सलग दुस-या पराभवानंतर पाकिस्तान चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पाक संघाला अद्याप गुणतालिकेत आपले खाते ही उघडता आलेले नाही. सुपर -८ मध्ये पोहोचण्यासाठी त्यांना पुढील दोन्ही सामने मोठ्या अंतराने जिंकावे लागतील. ११ जून रोजी पाकचा संघ कॅनडाशी भिडणार आहे, तर १६ जून रोजी आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे.