मुंबई : राज्यात किमान तापमान घसरले असून थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील अनेक भागात थंडी जाणवत आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईत सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. मुंबईत किमान १९.४ अंश सेल्सियस इतके तापमान होते. यंदाच्या हंगामात दुस-यांदा २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.
याआधी ३० नोव्हेंबरला २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले होते. तेव्हा १९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले होते. बुधवारी सकाळी सांताक्रूझ येथे १९.४ अंश सेल्सिअस तापमान होते. तर कुलाब्यात २१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभरातही तापमानाचा पारा कमी होता. कुलाब्यात कमाल ३०.८ तर सांताक्रूझमध्ये ३२.४ अंश सेल्सिअस तापमान होते.
मुंबईप्रमाणे पुण्यातही कमी तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात पुण्यात सर्वांत कमी तापमान बुधवारी नोंदवले गेले. डिसेंबर महिन्यात पुणे शहरासह परिसरात कडाक्याची थंडी जाणवते. मात्र यावेळी अद्याप थंडीचा कडाका वाढलेला नाही. बुधवारी १५ अंश किमान तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच इतके कमी तापमान नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. पुण्यात पुढच्या चार दिवसांत तापमानाचा पारा आणखी खाली येईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
अग्नेय अरबी समुद्रात मालदीव बेटाजवळ समुद्रसपाटीपासून ३.१ किमी उंचीवर चक्राकार वा-यांची स्थिती कायम आहे. परिणामी राज्यात आकाश निरभ्र असून पहाटेच्या सुमारास हवेत गारठा वाढला आहे. पहाटे गारठा आणि दुपारी ऊन असे चित्र राज्यात सध्या आहे. पहाटे तुरळक धुकेही पडत आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
मुंबईतही किमान तापमानाचा पारा २४ अंशावरून २० अंशावर घसरला आहे. मुंबईत थंडीचा कडाका जाणवण्यासाठी जानेवारीचा पहिला आठवडा उजाडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.