कोल्हापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान कमालीचे वाढू लागले आहे. त्यातच भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाविकास आघाडीच्या मेळाव्यात दिसल्यास त्यांचे फोटो काढून व्हीडीओ बनवा, नंतर त्यांची नावे मला पाठवा, मग मी त्या महिलांना धडा शिकवेन, असे वादग्रस्त वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केले होते.
महाडिकांच्या या वक्तव्यावर महाविकास आघाडीने प्रत्युत्तर दिले आहे. खासदार धनंजय महाडिक हे खुल्या व्यासपीठावरून महिलांना गुंडांप्रमाणे धमकावत आहेत. भाजपची खरी रणनीती, चारित्र्य आणि चेहरा याचाच हा पुरावा आहे. भाजप केवळ महिलांचा सन्मान करण्याचे नाटक करत आहे. महिलांना धडा शिकवणा-यांना महाराष्ट्रातील जनता चोख प्रत्युत्तर देईल, अशा शब्दांत काँग्रेसने धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, विरोधकांनी घेरल्यानंतर महाडिकांंनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले. महाडिक म्हणाले, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. २ कोटी ३० लाख महिलांना त्याचा लाभ झाला आहे. माझे म्हणणे असे होते की जर काही महिला काँग्रेससोबत जात असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यांना लाभ मिळावा म्हणून त्यांची नावे आणि छायाचित्रे काढावीत अशी आमची इच्छा आहे. पण काँग्रेसने ते चुकीच्या पद्धतीने घेतले आणि त्याचा अपप्रचार करत आहेत.
विरोधक गैरसमज पसरवतात : महाडिक
राज्यातील महायुतीच्या सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. मात्र महाविकास आघाडीचे नेते या योजनांबाबत जनतेमध्ये गैरसमज पसरवत आहेत. या अफवांना सर्वसामान्य जनता विसरणार नाही.