कोल्हापूर : बास्केट ब्रिजची वर्कऑर्डर निघून काही महिने झाले, तरी अद्याप काम सुरू नाही. या कामात राजकारण सुरू आहे का? या ब्रिजचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. तुम्हाला त्यांचा अपमान करायचा आहे का?, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी येथे जिल्हा प्रशासनाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धारेवर धरले.
याच बैठकीत इचलकरंजीतील पाणी प्रश्नावर आमदार प्रकाश आवाडेही आक्रमक झाले. इचलकरंजीला पाणी मिळावे, अशी तुमची इच्छा नाही, असा आरोप त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या या बैठकीत आवाडे आणि महाडिक यांनी विविध प्रश्नांवर जाब विचारला. बैठकीत नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम यांनी बास्केट ब्रिजचा विषय उपस्थित केला. वर्कऑर्डर मिळूनसुद्धा अजून काम कसे सुरू झालेले नाही, असे त्यांनी विचारले. यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, बास्केट ब्रिज या संकल्पनेची राजकारणातून खिल् ली उडवली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प मंजूर केला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बास्केट ब्रिजचे भूमिपूजन केले. त्यानंतर निविदा निघाली, वर्कऑर्डरही मिळाली, तरी अद्याप ब्रिजच्या कामाला सुरुवात झालेली नाही.
प्रशासन पण यात राजकारण करत आहे का? केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करूनही काम सुरू होत नाही. तुम्हाला केंद्रीय मंत्री गडकरी यांचा अपमान करायचा आहे का, असा खरमरीत सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी केला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीवरील पूल पिलरचा करायचा आहे. त्याचा नवा आराखडा केला जाणार आहे. त्यामुळे हे काम थांबले आहे, असे उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले. यावर दोन्ही ब्रिज वेगळे आहेत. त्यामुळे त्यांचे आराखडे वेगळे आहेत. आवश्यक ते बदल करून त्वरित काम सुरू करावे. जिल्हाधिका-यांनी या कामासाठी व अन्य ब्रिजसाठी एक सल्लागार नेमावा. त्यामुळे दिल्लीमधून निधी आणता येईल, असे महाडिकांनी सांगितले.